© अपूर्व विकास
…अर्धा तास मुद्दाम ताटकळत बसवल्यावरच आत बोलावलं गेलं तिला. ती गेली. तिचं चालणं शांत. पण सजग. सावध. आणि स्वत:वरच्या विश्वासाने भरलेलं. आणि तिच्या निळ्या डोळ्यांतली पापणी न लवणारी ती भेदक पण समजदार चमकही तशीच. भारणारी.
जी. एम. सरांची केबिन तिच्या येण्याने अचानक भरून गेल्यासारखी झाली. ती आली तसे सुजाता आणि श्रीधर खुर्चीतल्या खुर्चीत चुळबुळले. ती मनात हसली. वास्तविक तिच्यावर प्रेशर टाकण्यासाठी ते दोघं मुद्दाम आधीपासून सरांच्या केबिनमध्ये होते; शिवाय तिला दोघांच्या मध्ये बसावं लागेल, अशा पद्धतीने खुर्च्यांची तजवीजही केलेली होती. म्हणजे तिघं मिळून तीन दिशांनी तिच्या बचावाचा फुटबॉल करण्याच्या तयारीत होते. ती एकटी. हा पहिला वार. मग हे चुळबुळणं कशासाठी?
सरांनी न बोलता हनुवटीने “बस” अशा अर्थी खूण केली. तिचं बसून होईपर्यंत तिघांच्या नजरा तिच्यावर खिळलेल्या. तिला खास जाणवाव्यात, अशा प्रकारे. हा दुसरा वार. वास्तविक गळ्यापासून पायाच्या बोटांपर्यंत ती पोशाखाने झाकलेली होती; पण तरूण पोरीने पोत्यात स्वत:ला गुंडाळलं तरी तिचं तारूण्य दिसतंच. केसांना गरजेपेक्षा जास्त ताणून गच्च अंबाडा घालून स्वत:वर “कॉर्पोरेट” असा स्टँप मारून घेतलेली सुजाता, आणि अमेरिकेत एम एस करून परतलेला श्रीधर, दोघांनी एकमेकांकडे पाहून नापसंतीदर्शक मान हलवली. वातावरणनिर्मिती यांच्याकडून शिकावी! हरकत नाही. हिने खांदे सरळ केले; पाठ ताठ केली अन् सावकाशपणे सरांच्या नजरेत आपली निळी नजर फेकली. तिच्या त्या सहजतेत त्यांचे दोन्ही वार ढेपाळले.
“मिस् आकाशी,” सरांनी धीरगंभीर आवाज लावला, “कामं टाळण्याची सवय दिसते तुम्हाला.”
हा तिसरा वार होता. पण अपेक्षित असा. हे होणारच होतं. कारणही तसंच होतं. आज सोमवार होता. सुजाता आणि श्रीधरने गेल्या शुक्रवारी तिला संध्याकाळी पाच-एकोणसाठ वाजता, म्हणजे कंपनी सुटायला एक मिनिट बाकी असताना, अशी कामं सांगितली होती, जी त्यांच्या दृष्टीने “इमिजिएट्ली” व्हायला पाहीजे होती. आणि हिने सरळ “नो, सॉरी” म्हणून सांगितलं होतं. त्यावर अर्थातच “व्हॉट द हेल डू यू मिन ‘नो, सॉरी’?” वगैरे किंचाळणं झालं… “वर्क एथिक्स”ची कौतुकं गाऊन झाली… “प्रोफेशनल अटिट्यूड”ची संस्कारशिबीरं घालून झाली… “तू स्वत:ला काय समजतेस?” झालं… “आपले अमुक-तमूक सर आजही सोळा तास काम करतात” ऐकवून झालं… “कस्टमर इज द किंग” वाजवून झालं… सगळं झालं. हिने त्यांच्या सिनिअरिटीचा मान ठेवून फारतर मिनिटभर ऐकून घेतलं; सहाच्या ठोक्याला हिने खटकन आवाज फेकला,
“गणित चुकतंय तुमचं. कंपनीची वेळ आहे नऊ ते सहा. मी डॉट नऊला कामावर येते. नो पर्सनल लिव्हज सो फार. आणि ज्याअर्थी दोन वर्षांच्या नोकरीत तीन वेळा अवॉर्ड मिळालंय त्याअर्थी मी माझं काम चोख करते; म्हणजेच डॉट सहाला काम बंद करून माझं पर्सनल आयुष्य जगणं सुरू करण्याचा अधिकार मी कमावते. विषय संपला. मला निघण्याची पर्मिशन नकोय; कारण तो माझा नैसर्गिक हक्क आहे; आणि तो मला कोणीही नाकारू शकत नाही.” शांत आवाज. नेहमीचीच वेधक नजर. आणि मग त्यांच्या पुढच्या हतबुद्ध किंचाळण्याकडे सपशेल दुर्लक्ष करून ही बाहेर पडली. हेच इगो दुखावलेले भाव तिने तेव्हाही त्यांच्या चेहऱ्यावर पाहिले होते, जेव्हा श्रीधरच्या “कॉफी घ्यायला जाऊ”ला अन् सुजाताच्या “माझ्यासाठी कॉफी घेऊन ये”ला तिने असंच सहज पण स्पष्टतेत नाकारलं होतं. म्हणून आज सकाळपासूनच दोघं फिल्डिंग लावून बसले होते – तिला “धडा” वगैरे शिकवण्यासाठी. दोघांनी तिखट-मीठ लावून जी. एम. ना पढवलं होतं; जेणेकरून आजवरचं तिचं सारं कर्तृत्व नाकारून, “कामं टाळण्याची सवय” या शब्दात तिच्या आत्मसन्मानाची वासलात लावता येईल. सरळ हिशेब होता…
…जो तिने त्यांच्याआधी ओळखून ठेवला होता!
“हो सर; खरंच नालायक आहे मी,” तिने प्रत्युत्तर दिलं; अन् तिघांच्याही अकला ढगात. त्यांना अपेक्षित होता तो म्हणजे बचाव; अन् हिने वेगळाच डाव टाकला. सरळ कबुली? आणि तीही आत्मवंचना करणारी? म्हणजे? तिसरा वार – पुन्हा चुकला. ती परत मनात हसली. वडील आर्मीत होते तिचे. लहानपणीच मिळालेला धडा – शत्रूला प्रत्युत्तर देताना, डू द अनएक्स्पेक्टेड. अपेक्षित असलेली उत्तरं द्यायला ही शाळा नव्हे. हा जीवनसंघर्ष आहे. जे अपेक्षित नाही ते प्रत्युत्तर असतं; युद्ध तिथे जिंकलं जातं.
“लहानपणापासूनच अशी नालायक मी. अभ्यास तासाभरात आटपायचे. माझी मैत्रीण तशी नव्हती. ती तीन तास अभ्यास करायची – अर्थात, समोर टी व्ही लावून… मग तीन तास लागणारच ना? आणि मग माझी मुलगी कित्ती अभ्यास करते, हे ऐकवायला तिची आई आमच्या घरी यायची; आणि माझी आई माझ्यावर चिडायची. नालायक ना मी… शेवटी मी दहावीत बोर्डात आले आणि ती परीक्षेच्या दिवशी अतिताणाने आजारी पडली; तेव्हा कुठे आमच्या दोघींच्या आयांची बत्तिशी वाजणं बंद झालं.”
“हं?” श्रीधर काही न कळून बावचळलेला; सुजाताची बत्तिशी नुसतीच उघडबंद होतेय. सरांच्या डोळ्यात थोडीशी वेगळी चमक.
“आकाशी, तुला कळतंय का तुला इथे का बोलावलंय?” सुजाताने प्रश्न फेकला.
“मला कळतंय गं; फ्रायडेचा माझा नतद्रष्टपणा ना? तो का दाखवावा लागला ते तुला कळलंय का बघ.” ही गोड हसत म्हणाली. सुजाताचा चेहरा क्षणात लाल.
“सर,” तिच्याकडे दुर्लक्ष करत ही पुढे म्हणाली, “आज जेव्हा मी मोठी झाल्ये ना, तेव्हा माझी आणि माझ्या त्या मैत्रिणीची रुपं कित्तीतरी लोकांत दिसतात मला. आता आपल्याकडेच पहा. इथे माझ्यासारखे काही निवडक स्री-पुरूष आहेत, जे ‘कामाच्यावेळी फक्त काम’ असा ‘वेडेपणा’ करतात आणि नऊ तासांच्या वेळेत काम संपवतात; ‘जास्त वेळ थांबून काम करणं’ ही ‘उदात्त’ परंपरा नाकारतात. बाकीच्यांना पंधरा तास पुरत नाहीत. कारण? कित्ती कामं असतात लोकांना! कामाच्या वेळेत व्हॉट्स अप चे मेसेजेस पाहायचे असतात. फेसबूकचा फीड चेक करायचा असतो. जेवणात पाल पडल्ये असा चेहरा करून सेल्फी घ्यायचे असतात. ते इन्स्टाग्रामवर अपलोड करायचे असतात. पन्नास वेळा चहा हवा असतो; साठ वेळा कॉफ्या हव्या असतात. कामच हे असं – त्याचा स्ट्रेस अगदी सहनच होत नै; म्हणून दिवसातून वीस वेळा बाहेर जाऊन सिगारेटी फुकायच्या असतात. त्यात आमची महिलाशक्तीही मागे नसते. मग कुणाकुणाचे वाढदिवस असतात. त्यासाठी केक आणायचे असतात; ते एकमेकांच्या तोंडांना फासायचे असतात – का? कारण आमचे अमेरिकन पोशिंदे तसं करतात ना, म्हणून. आणि मग ते फुकट गेलेलं अन्न वॉशबेसिनवर धुवून झालं, की वॉशरूमबाहेर उभं राहून “भारतात अन्नसुरक्षा का होऊ शकत नाही” आणि त्यात “पंतप्रधानांचं कुठे चुकतंय”, यावर आम्हा विद्वानांना चर्चा करायच्या असतात. खरंच, इतकी कामं असतात की कामं होण्याचा संबंधच येत नाही. मोदींच्या मैनेजमेंटची चिकित्सा करण्यात स्वत:ची कामं मैनेज करायचं राहूनच जातं. मग ताण येतो. तो घालवायचा कसा? सुजाताला विचारा. तिच्या स्क्रीनवर वर्कशीटच्या मागे Elle मासिकाची साईट असतेच. एमी जेकसन आणि प्रतीक बब्बरचं भांडण नक्की कशावरून झालं, ते हिला कळायला नको? किंवा आपल्या श्रीधरला विचारा. तो रात्री दोनपर्यंतही इथे थांबतो. का? त्याची ब्राऊजर हिस्टरी चेक करा. कामाचा ताण घालवण्यासाठी शरीरसुखाचे बाजारू देखावे देणारे कारागीर इंटरनेटवर फुकट मिळतात; ते आजूबाजूला कुणी नसताना रात्री बारा ते दोनमध्ये श्रीधरचे सगळे ताण संपवतात. तिकडे श्रीधरच्या बॉसना पहाटे अडीचला मेल मिळते, “वर्क डन, सर” म्हणून. बॉस खूष. म्हणतो, कित्ती गुणाचा तो श्री माझा. रात्रभर काम करतो. आपल्याकडे अँटीव्हायरस टीम आली होती, त्यांना सपोर्टला मीच होते; त्यावेळी ह्याच्या वर्कस्टेशनचा scan घेतला तेव्हा कळलं मला हे.”
श्रीधरला दरदरून घाम. सरांनी एका नजरेत त्याचे प्रतिवाद हेरले आणि नजरेनेच थांबवले. सुजाताचा श्वास घशात कोंडलेला. चेहऱ्यावरचे भाव अभिनयशक्तीने भराभर पालटत ती आकाशीवर गरजली, “तुला असं म्हणायचंय का की आम्ही फक्त टाईमपास करतो? आकाशी तू जूनिअर आहेस. आम्हा सिनिअर मैनेजमेन्टला अक्कल शिकवण्याचा आगाऊपणा करू नकोस.”
“सिनिअर मैनेजमेन्ट?” आकाशीची तेजस्वी नजर थेट मेंदूत चमकली सुजाताच्या. “सुजाता, जेव्हा दुसऱ्यांच्या त्यागावर स्वत:च्या यशाचे डोलारे उभे करण्याची गरज भासते ना, तेव्हा मैनेजमेन्ट उरत नसते; फक्त कमतरता झाकणाऱ्या वर्चस्ववादी देखाव्यांची केविलवाणी धडपड तेवढी उरते.” सुजाता पांढरीफटक पडली.
“सर,” हिने आवाजाची पट्टी आणखी शांत केली; “इतरांप्रमाणे स्वत:चं अख्खं आयुष्य कंपनीला बळी देण्याचा ‘समजुतदारपणा’ न करणाऱ्या मला ‘कामं टाळण्याची सवय’ या सबबीखाली आज या चौकशीला सामोरी जावं लागण्याचं एक खास कारण आहे. सांगते. आपल्याकडे सध्या विकृत जीवनशैलीचं उदात्तीकरण करणारं एक विचित्र दुष्टचक्र चालू आहे. नफेखोर धूर्तांनी नफ्यासाठी शोधून काढलंय ते. पुर्वी गुलामांच्या हातांना बेड्या असायच्या; आता त्यांच्या मनांना घातल्या जातात. फायद्याचं ठरतं ते. कसं? कॉर्पोरेट कल्चरमध्ये तुम्ही एकतर कुणा इंडस्ट्रीत नोकरदारी करत असता; नाहीतर कुणा इंडस्ट्रीत बनलेली प्रॉडक्ट्स खरेदी करत असता. Either way, तुम्ही त्यांचा फायदा करून देत असता. तुम्ही चंगळवादी आणि उपभोगवादी कंझ्युमर असण्यालाच जीवनाचं सार समजणं, हे त्या धूर्तांना हवंय. स्वत:च्या हावरटपणाला ‘महत्वाकांक्षा’ हे रोमँटिक नाव देण्याची दीक्षा याच पाश्चात्यांनी आपल्याला दिल्ये. नवश्रीमंतीच्या लोभापोटी तुम्ही गुरासारखे काम करा; आणि जे पैसे मिळतील त्याने आम्हीच दिलेलं श्रीमंतीचं सोंग विकत घ्या. आपले विदेशी पोशिंदे आपल्याला प्रोजेक्ट्सची आमीषं दाखवतात. आपण हव्यास आणि असुरक्षिततेच्या गर्तेत गांगरून प्रोजेक्ट्स अंगावर घेत सुटतो. डेडलाईन्सच्या भीतीपोटी आणि प्रमोशनच्या आमीषापोटी पर्सनल लाईफ, कुटूंब, फिटनेस सारंकाही विसरून स्वत:ला आणि इतरांना ओरबाडत राहतो, वापरून घेत राहतो. त्या धूर्तांना भारतासारख्या थर्ड वर्ल्ड कंट्रीत स्वस्तातले उच्चशिक्षित कामगार मिळतात. त्यांची प्रॉफिट्स तर सोडाच; आपल्याच हुद्द्यावरच्या विदेशी नोकरदारांचा पगार आणि आपलं रुपड्यातलं मानधन यातला फरक पाहीला तर वास्तविक घाण्याला जुंपलेल्या बैलापेक्षा अधिक ते आपल्याला लेखत नाहीत, हे सहज कळतं. तसं ते कळू नये म्हणूनच त्यांनी आपल्या डोळ्यांवर बेगडी ‘मॉडर्न लाईफस्टाईल’ची झापडं लावल्येत; आणि आपण लावून घेतलीयेत.”
“पण-” सुजाताने तोंड उघडलं; पण आकाशीने थंड करारी आवाजात, “माझं बोलणं पूर्ण नाही झालंय” म्हणून तिला गोठवलं.
“ही अंतहीन ओढाताण लक्षात आली, आणि तिला पर्याय नाही असं स्वत:ला समजावलं, की आपण कामाच्या ठिकाणी हातपाय पसरू लागतो. आठ-नऊ तासात शिस्तबद्ध काम करण्यापेक्षा तेच काम चौदा-सोळा तासात पसरवलं जातं. त्याला ‘अॉफिस एंजॉय करणं’ असं गोंडस नाव मिळतं. आपण ढिले पडतो. इतरांनाही पडायला लावतो. त्या ढिलेपणाला सोयिस्करपणे कामाच्या तासात मोजून त्याचंच उदात्तीकरण सुरू करतो – ‘आम्ही कित्ती काम करतो’ म्हणून. नवीन आलेल्या एम्प्लॉयीच्या तोंडावर ‘शिकण्याची संधी’ या चतुर पार्सलमध्ये गुंडाळलेला विनामोबदल्याचा ओवरटाईम फेकला जातो. माणूस नाही म्हणाला तर त्याच्या आत्मसन्मानाला “उद्धटपणा” आणि “पूअर अटिट्यूड” या शीर्षकात कोंडून मारायचा प्रयत्न होतो. स्वत:च्या आणि इतरांच्या पर्सनल आयुष्याचे अधिकार काढून घेऊ लागतो आपण, त्यासाठीचा वेळ नाकारून. प्रगत तंत्रज्ञानाने कामाचे तास कमी होणं अपेक्षित होतं; पण माणसालाच यंत्र म्हणून गृहीत धरून आपण तेच तास वाढवून ठेवलेत.”
नकळत सरांनी होकारार्थी मान हलवली. हातांचे तळवे सावकाश हवेत उचलत ही पुढे म्हणाली,
“आणि या सगळ्यात ही आकाशी नावाची एक मुलगी अडचणीची ठरते; कारण ती कामाच्या ठरलेल्या नऊ तासात साधं व्हॉट्स अप सुद्धा पाहात नाही; कामं वेळेत पूर्ण करते; करता येतात हे दाखवून देते; काहीही पेंडिंग राहात नाही. तिथे इतरांचे आळस आणि हिची तत्परता जुळत नाही. तिला टीम वर्कची भलावण शिकवली जाते; कारण आळसावलेल्या लोकांना सोयीचं जावं म्हणून ती स्वत:च्या चालण्याचा वेग कमी करत नाही. ते इतरांच्या पोत्याप्रमाणे पसरलेल्या कम्फर्ट झोन्सना अडचणीचं ठरतं.”
“पण आपल्याला दुनियेप्रमाणे चालता यायला हवं,” श्रीधरने डाव टाकून पाहीला.
“दुनियेचं चालता येणंच बंद झालं असेल तर? म्हणून सशक्त असतानाही अपंगत्व ओढवून घ्यायला सांगतोस मला?” आकाशीचा सौम्य आवाज त्याचे युक्तिवाद चिरत गेला. “सर, दुनियादारी करून झाल्यावर अचानक परिस्थितीची जाणीव झालेल्या श्रीधर आणि सुजाताची तथाकथित ‘इमर्जंसी’वाली कामं ही आकाशी नाकारू शकते; कारण ते त्यांच्या आळसाची शिक्षा आपल्याला देतायत हे तिला लगेच लक्षात येतं. ‘इमर्जंसी’ तिच्यामुळे तयार झालेली नसते. ‘कित्ती स्ट्रेस असतो’ या शब्दांनी स्वत:च्या सिगारेटच्या व्यसनाला कुरवाळणारे केविलवाणे जीव पाहून तिला खरंच विषाद वाटतो. का? कारण ‘स्ट्रेस’ कोळून प्यायलेली व्यक्ती तिने घरात पाहिलेली असते. बॉर्डरवर लढणाऱ्या नवऱ्याचे येऊ न शकलेले फोन, दोन पोरांचा शाळेचा डबा, पक्षाघात झालेल्या सासू-सासऱ्यांच्या स्वच्छता, केर-लादी-कपडे-भांडी, हे सारं निभावण्यासाठी चारला उठणारी आणि बाराला झोपणारी आई तिने पाहिलेली असते; जी पोरं संध्याकाळी घरी येतील तेव्हा त्यांच्यासाठी पोहे नि थालीपीठं करून ठेवते, वर्षानुवर्षं. दिवाळीचे फराळ चुकलेले नसतात, वर्षानुवर्षं. कौतुकाच्या एकाही शब्दाशिवाय आणि अपेक्षांच्या महाकाव्यासहित. त्या आईने कधी ‘कित्ती स्ट्रेस असतो’ म्हणून सिगरेट पेटवलेली तिने पाहिलेली नसते. इथे कंपनीत टीम स्पिरीटच्या नावाखाली स्वत:ला कामाचं गाढव करून घेऊन दुसऱ्यांचे आळस पोसण्याचा सोशिक मूर्खपणा मी करत नाही; कारण मी, एक शिस्तप्रिय मुलगी, आपल्या कामावर आणि प्रोफेशनवर प्रेम करते; आणि इतरांची फाजील कौतुकं करून त्यांना लाडावून ठेवण्यातले धोके चांगलेच जाणते. हे ज्यांना झेपत नाही ते माझी चौकशी करवण्यासाठी कामं सोडून जी एम च्या केबिनमध्ये लोणचं घालत बसतात. आणि अशी मी एक नाहीये. असे इथे निवडक काही जीव आहेत, ज्यांना ‘कर्तव्य’ कळतं. असो. मी चाललीये माझ्या क्युबिकलमध्ये; कामाच्या वेळेचा आणि जे खरोखर सिन्सिअरली काम करतायत त्यांच्या सचोटीचा आणखी अपमान नको. थँक यू, सर.”
दोन काळेठिक्कर चेहरे, आणि भविष्यातला कंपनीचा आधार गवसलेली एक उजळलेली मुद्रा मागे सोडून आकाशी केबिनमधून बाहेर पडली.
तितक्याच शांतपणे.
तितक्याच स्वत्वयुक्त करारीपणे.
– अपूर्व विकास
समुपदेशक व मानसशास्त्र तज्ज्ञ
(Counselor and psychologist)
निगडी, पुणे
8928183848
7774917184 (WhatsApp)
facebook.com/CounselorApoorv
© अपूर्व विकास
#मराठी #लेख #नोकरी #तरूण #युवा #संघर्ष #संवाद #ताण #तणाव #corporate #office #job #stress #overtime #anxiety #depression #exploitation #boss #leader #deadline #modern_life #individuality #communication #youth #corporate_bullshit #work_hours #ambition #life_goal #counseling #self_help #oppression #bold #assertive #bullyism #victim #success #courage #understanding #awareness #self #self_help