रिलेशनशिप
– ©अपूर्व विकास
“… मम्मी, तू आणि बाबाने इंपॉसिबल अडचणी असताना त्या काळात love marriage केलंत… गेली बत्तीस वर्षं संसार सक्सेसफुल केलात… आमच्या पिढीला का गं जमत नाहीये हे?” तिशीची लेक हातातला फोन टेबलवर आपटत म्हणाली. चार वर्षं मज्जेत बॉयफ्रेन्ड असलेल्याचा आठ महिन्यांपुर्वी हजबन्ड झाल्यानंतरचा हा राग होता.
“प्रश्न विचारलायस,” पंचावन्नची आई त्या फोनला पडलेल्या चऱ्यांकडे पाहत शांत आवाजात म्हणाली; “उत्तर हवंय, का ‘हो न गं, खरंच की न गं’ म्हणून प्रश्नाला गोंजारायला हवंय?”
“उत्तर हवंय”, लेक म्हणाली. आई दुसऱ्या अॉप्शनला भीक घालत नाही हे तिला माहीत होतं.
“कसंय न बाळा,” आई सहजच म्हणाली;
“आम्ही ‘कसं जमवता येईल’ ते शोधत होतो; तुम्ही ‘जमलं तर पाहू’ म्हणताय.
“आमच्या वेळी प्रेम हे व्हायचं; तुमच्या काळात ते केलं जातं.
“आम्ही साथीदार व्हायचो; तुम्ही पार्टनर बनवता.
“आमच्यात प्रेम ही सहजता होती; तुमच्यात तो अट्टहास झालाय.
“आमचं प्रेम लहानाचं मोठं व्हायचं; तुमचं प्रेम लहानपणीच घाई करतं.
“आमच्या वेळी मैत्री विश्वासात रुपांतरीत व्हायची; तुम्ही जवळिकीला रिलेशनशिपचा बोर्ड लटकवण्याची घाई करताय.
“आम्ही कविता लिहायचो; तुम्ही त्या फॉरवर्ड करताय.
“आमचे जीवनसाथी होते; तुमचे बॉयफ्रेन्ड नि गर्लफ्रेन्ड आहेत.
“आमचं प्रेम आमच्यासाठी होतं; तुमचं प्रेम ‘सगळ्या फ्रेन्ड्सचा बॉयफ्रेन्ड आहे मग माझाही असलाच पाहीजे’, म्हणून केलं जातंय.
“आमचे बॉयफ्रेन्ड नव्हते; कारण जो आहे तो फ्रेन्ड असण्याच्या खूप पुढे गेलाय, हे आम्हाला स्पष्ट जाणवायचं. तुमच्यात इन्स्टाग्रामवर अकाउंट असलंच पाहीजे तसा बॉयफ्रेन्डही असलाच पाहीजे, असंय.
“आम्ही गिफ्ट नव्हे तर स्वत:लाच समर्पित करायचो; तुमच्या गळाभेटीतही भेट कितीची आणली असेल याची कैलक्युलेशन्स असतात.
“आम्ही धुंद होतो; तुम्ही उधळलेले आहात.
“आम्ही चेहऱ्यावरचं तेज शोधायचो; तुम्ही शर्टचा ब्रान्ड पाहताय.
“आम्हाला नजरेतली समजदार चमक भाळायची; तुम्हाला गॉगलच्या किमती भुरळ घालतायत.
“आमच्या शरीरांना पेशन्स मंजूर होता; तुमच्या मनालाच तो नकोय.”
…”बाळा; जमणं – न जमणं हे क्षमतेवर अवलंबून असतं. क्षमता डेवलप करायची असते. आम्ही दोन सक्षम जीवांच्या सक्षमतेचा परिणाम म्हणून प्रेमात येत होतो; तुम्ही ओढवून घेतलेल्या अपंगत्वाचा दुसऱ्याने येऊन ऊद्धार करावा, म्हणून प्रेम डिक्लेअर करण्याचा उतावळेपणा करताय. आम्ही प्रेम या शब्दाच्या अंकित होतो; तुम्ही त्याला तुमच्यातल्या असुरक्षिततेपोटी वेठीस धरताय.”
“पण मग मम्मी, मी करू काय?”
आई हसली. म्हणाली, “जे करिअरसाठी करतेस तेच. स्वत:ला वाढवणं. स्वत:ला डेवलप करणं. आयुष्यात जे करतेस ते गरजांच्या भीतीपोटी केलंस तर हरशील. जे करतेस ते स्वत:च्या काबिल व्यक्तिमत्वाचं एक एक्स्प्रेशन, एक रिफ्लेक्शन, एक प्रतिबिंब म्हणून केलंस, तर जिंकशील…
… जा. आधी स्वत:वर फोकस कर. आपली जागा भक्कम कर. विचाराने. विवेकाने. मान्य आहे, भावनाप्रधान असतो आपण; पण भावना बुद्धीने हाताळता येतात. त्या आल्या, बदाबदा कोसळल्या, आणि आपण झेलपटलो, हे उपयोगाचं नाही. भावनांमागचा विचार तपासून घे. तुझे beliefs तपासून बघ. त्यालाही तेच करायचंय. इथे स्री किंवा पुरुष हा मुद्दाच नाही; जे हवंय ते दोघांनाही. मग प्रयत्नही दोघांचे हवेत. पण ते दुसऱ्याने करणं आपल्या हातात नाही. आपल्या हातात आपले प्रयत्न आहेत. ते कर. तुमच्या दोघांच्या अपेक्षा तपासून बघ. आस आणि हट्ट यातला फरक समजून घे. प्रेम देण्या-घेण्यापेक्षा प्रेमस्वरुप असण्यात मजा आहे. आपल्या आनंदाची जबाबदारी आपली असते. रिलेशनशिप ही प्रेम अन् आनंद देण्या-घेण्याची एक संधी असते; पण तो आनंद दुसऱ्याने द्यायचा नसतो, तर आपण घ्यायचा असतो. नसेलच त्याच्यात काही चांगलं, तरी हरकत नाही. वेगळी हो; पण इतके दिवस स्वत:च्या नक्की कोणत्या गैरसमजेच्या पुर्तीसाठी आपण त्रास सहन करत होतो, तेही ओळखून बाहेर पड; म्हणजे पुढल्या वेळी शहाणी राहशील. भेटायचंय ते रोज नव्याने; कालच्यापेक्षा आज चार आणे अधिक समजुतीने. स्वत:वर विश्वास ठेव. चांगल्या गोष्टी गुरुत्वाकर्षणाप्रमाणे तुझ्यापर्यंत येतील.”
– समुपदेशक अपूर्व विकास
(निगडी, पुणे)
8928183848/7774917184
facebook.com/CounselorApoorv
©Apoorv Vikas
#मराठी #लेख #ललित #वैचारिक #कथा #सकारात्मक #marathi #positive #thought #relationship #social #boyfriend #girlfriend #husband #wife #breakup #divorce #love #romance #understanding #growth #goal #life