© अपूर्व विकास
– “आमचं काही चुकलं का ?”
– “बरोबर कशाला म्हणायचं याच्या तुमच्या व्याख्येवर ते अवलंबून आहे.”
– “आमच्या मुलांना वाढवण्यात आम्ही कमी पडलो का ?”
– “गुरं ‘वाढवली’ जातात. मुलांना स्वत:हून वाढण्याची संधी दिली जाते.”
– “दोन्ही मुलं दूर आहेत आमची, शिक्षणासाठी. इतरांची मुकाट्याने पार्ट-टाईम जॉब करतात. ही दोघं सरळ ‘नाही’ म्हणून मोकळी. काय वाईट आहे, स्वत:च्या शिक्षणाला स्वत: हातभार लावला तर ? आम्हालाच पैसे ट्रान्सफर करायला तगादा लावतात. नाही जमत हो… एफ-डीज मोडल्या सगळ्या यांच्याच इच्छांसाठी… आपण पोरांसाठी कमी नको पडायला म्हणून झिजतोय आम्ही; पण शेवटी आम्हालाही आमच्या म्हातारपणासाठी चार पैसे शिल्लक ठेवणं गरजेचंच आहे ना ? का नाही कळत यांना आपल्या जबाबदाऱ्या ?”
– “व्यवस्थित कळतायत त्यांना.”
– “पण-”
– “पण सिंहाचा छावा एकदा उपाशी राहिल्याशिवाय स्वत: शिकार करत नाही. गरूडपक्षाचं पिलू आईबरोबर हवेत असताना आईने अचानक सोडून दिल्याशिवाय उडायचं शिकत नाही.”
– “म्हणजे आम्ही मुलांना नशीबाच्या हवाली करायला हवं होतं का ?”
– “नाही; तो मूर्खपणा झाला असता. आणि सिंहीण किंवा गरूडही तसं करत नाहीत. एका अंतरावर राहून लक्ष ठेवतात ते. तशीच गरज पडल्यास सुरक्षा देण्यासाठी. पण सतत कडेवर घेऊन नसतात. एक स्पेस गरजेची असते, पोरांच्या वाढीसाठी. आईबापानेच करून दिलेली; त्यांच्या दृष्टीच्या आणि शब्दाच्या टप्प्यातली; पण त्यांची सततची उपस्थिती नसलेली. आजूबाजूच्या परिस्थितीला पोरं साद घालतात; त्या हाकेला बरेवाईट प्रतिसाद येतात; त्यातून अनुभव येतो. त्यावेळी आईबापाने त्या स्पेसमध्ये परत एन्ट्री घ्यावी. आस्थेने, विश्वासाने चौकशी करावी. आपण मम्मीपप्पाशी कोणत्याही विषयावर बोलू शकतो, याचा विश्वास येऊ द्यावा. घडल्या प्रसंगाचा अनुभव आईबापासमोर मांडला, की संवाद घडवावा. ‘लागलं का?’ या मायेच्या ऊबेबरोबरच काय झालं, कसं झालं, हे मांडून कार्यकारणभाव लक्षात आणून द्यावा… आणि परत बाहेर पडावं; पोरांना स्वत:च्या प्रोसेसिंगला जागा देण्यासाठी. हे झालं नाहीये तुझ्या पोरांच्या बाबतीत.”
– “नाही कसं ? आम्ही तर सगळं best of the best दिलं त्यांना…”
– “तिथेच घात झाला. तुम्ही सगळं रेडी उपलब्ध करून दिलंत. शाळेत न्यायला-आणायला दोघं आळीपाळीने धावलात. एखाद्या दिवशी बसने येऊ द्यायचंत. शाळा सुटल्यावर त्यांच्या सवयीचं होतं, आईबापाचं ‘माझा मन्नू गं तो’. त्याबरोबरच, दहाच्या तिकिटासाठी पन्नासची नोट दिली की कंडक्टर कसा खर्जात खेकसतो, हेही अनुभवायला हवं. त्यांच्या पेनातल्या रिफील्स आणि पेन्सिलीतली शिसं संपलेली कधी त्यांना दिसलीच नाहीत; नव्या रिफीली नि लेड्स मम्मीच भरून ठेवायची. पार्टी-वेअरसाठी कोणते ब्रान्ड्स भारीतले आहेत हे त्यांना माहितीये; पण तुझ्या पोराला आजही शर्टाला स्वत: इस्त्री करता येत नाही; आणि पोरीला केस विंचरण्यासाठी माणसं बोलवावी लागतात. मला आठवतंय, हिचे sanitary napkins मम्मीने डिस्पोज करायचे, का तर हिला घाण वाटते, हा दिव्य प्रकार तुमच्यात वर्षानुवर्षं चालू होता ना ?”
– “अं… हो…”
– “आपल्या पोरांना स्विगी वर पटापट रेडीमेड फूड अॉर्डर करताना पाहून त्यांच्या ‘टेक्नोसॅव्ही’पणाबद्दल तुझा ऊर अभिमानाने भरून आला होता. वास्तविक त्यात विशेष कौतुकाचं काहीच नाही. दुनियेतल्या करोडो लोकांनी आपल्यातल्या आळसाला गोंजारणाऱ्या या चंगळवादी धंद्यांना आपला जीव विकला आहे. तुझी पोरं त्याच consumerist झुंडीत सामील झाली, इतकंच. माझ्या घरी आला होतात, तेव्हा ‘पुरणपोळीबरोबर नारळाचं दूध’, ही संकल्पना पाहून, ‘तुम्हाला कसं कळतं, कोणत्या कोकोनटमध्ये वॉटर असतं आणि कोणत्या कोकोनटमध्ये मिल्क?’ हा खतरनाक प्रश्न तुझ्या पोरीने मलाच विचारला होता. आजही दोघं साधा चहासुद्धा स्वत: करून घेऊ शकत नाहीत. याआधी मुंबईत कॉलेजला होते दोघं, तेव्हा बाहेरची घाण खाऊन acidity झाली की जेल्यूसिलच्या बाटल्या घेऊन तुम्ही दोघं पुण्याहून धावायचात. कशासाठी ? Acidity होती; TB नाही… लक्षात घे, त्यांनी स्वत:ला कधी मोठं केलंच नाही; कारण दुसऱ्यावर अवलंबून असण्यात मज्जा असते हाच संदेश त्यांना मिळालाय आयुष्यभर. कमतरता झुगारणं हा एक चॉईस असतो; मार कधी खाल्लाच नाही तर कशाला कोण कधी ताकद वाढवेल ?”
– “निरागस आहेत हो दोघं…”
– “निरागसपणा समजूतदारपणात बदलला नाही तर निसर्ग वाढीच्या अनास्थेची किंमत वसूल करायला लावतो.”
– “आता आम्ही काय करू ?”
– “वाढ तेव्हा होते, जेव्हा वाढ निकडीची होते. पैशाचा ओघ कमी करा. स्पष्ट आणि वास्तव शब्दात त्यांना लिहा, की हे आपल्या कुटुंबासाठी गरजेचं आहे; मम्मी-पप्पांना स्वत:च्या भविष्याचा विचार करण्याचा हक्क आहे; आणि तो विचार मुलांनीही आईबापासाठी करायला हवाय. कर्तव्य म्हणून नाही; प्रेमाची जबाबदारी म्हणून. त्याआधी हे स्वत:लाही समजावून द्या. अर्थातच हे वाचून ती दोघं चार दिवस बिथरतील; आपल्या उचकण्याला भाव मिळत नाही पाहून कामाला लागतील. सोपं नसेल; पण जगण्याची लढाई स्वत:त बदल करायचं इन्स्पिरेशन देतेच माणसाला. वाढ म्हणजे स्वत:तलं उपयोगाचं वाढवणं आणि निरुपयोगी असलेलं त्यागणं. ते निरुपयोगित्व आजवर मम्मी-पप्पाच्या कोषात लाडाचं होतं; पण बाहेर दुनियादारी करताना निरुपयोगीत्वाबद्दल फटके बसू लागले आयुष्याकडून, की जीवनाच्या व्यवहारशास्त्रात चोख होतात माणसं. वाढ तिथे होते.”
– “हो. करू आम्ही हे. अं… माझ्या बहिणीचा मुलगा आता चार वर्षाचा आहे. आमच्या चुका त्यांनी नकोत करायला म्हणून त्यांना काय सांगू ?”
– “त्यांना एवढंच सांग :- पन्नास वर्षांपूर्वी ‘तुझं तू बघ’ हे होतं. ते नको म्हणून पंचवीस वर्षांपूर्वी ‘नको बाळा, आम्ही करतो’ हे आलं. या दोन्हीपेक्षा, ‘चल, आपण दोघं मिळून करून बघूया’, हे उपयोगाचं ठरतं. एक शिक्षक प्रश्नांची उत्तरं देतो. एक गुरू प्रश्नांची उत्तरं कशी शोधायची ते दाखवतो. पोरगं जसजसं मोठं होत जाईल ना, तसतसं आईबापाच्या भूमिकेने शिक्षकापासून गुरूपर्यंत प्रवास करावा. प्रेमाच्या प्रवासात स्वावलंबनाच्या ड्रायव्हिंगचा कोर्स ठेवावा. पोराला मांडीवर बसवून गाडी शिकवता-शिकवता आपण हळूचकन passenger seat वर हलावं; एक हात स्टेअरिंगवर ठेवून. हाच असतो, यशस्वी ‘मम्मी-पप्पा’पणा !”

© अपूर्व विकास
समुपदेशक व मानसशास्त्र तज्ज्ञ
(निगडी, पुणे)
8928183848 (Phone)
7774917184 (WhatsApp)
Phone counseling is available.
http://www.facebook.com/CounselorApoorv
https://counselorapoorv.home.blog
{लेख शेअर केल्यास आभार.
कृपया शेअरिंग लेखकाच्या तपशीलासहित असावं,
ही नम्र विनंती. आवडल्यास जरूर कळवा!}
#आई #बाबा #आईवडील #पालक #पालकत्व #मम्मी #पप्पा #मुलं #संगोपन #संस्कार #कुटुंब #कौटुंबिक #वाढ #वृद्धी #व्यक्तिमत्त्व_विकास #स्वमदत #स्वावलंबन #व्यवहार #कौशल्य #जीवन #विचारधारा #धारणा #सशक्त #सक्षम #काबील #प्रेरणा #आत्मविश्वास #आत्मबळ #आत्मनिर्भर #सजगता