© अपूर्व विकास
नाही, खरंय. मला कळत नाही.
मग समजव ना मला.
नाही, खरंय. तुझ्या जागी मी नाही.
मग ने मला तिथे.
नाही, खरंय. तुला होणारा त्रास, तुझे भोग, अॉफिसची टेन्शन्स, तुझ्या जेंडर-गृपसमोरची आव्हानं, तुझे स्ट्रेसेस माझ्या वाट्याला नाही आलेत कधी.
मग सांग ना मला.
खरंय; माझ्या जाणीवेला मर्यादा आहेत.
ओलांडायला मदत कर ना मग.
मी इथेच आहे.
वाट पाहत. तिष्ठत. या आशेत, की –
तू येशील. तूच सांगितलेल्या वेळेत. प्रॉमिस केलेल्या ठिकाणी. जाऊ आपण.
खरंय, की माणसांच्या वचनांची कौतुकं परिस्थितीला नसतात. नाही जमणार तुला, प्रत्येक वेळी. कळतंय.
पण… कधीच नाही…?
प्रत्येक वेळीच कशी कामं निघतात?
प्रत्येक वेळीच कसे मित्र भेटतात?
प्रत्येक वेळीच कसा ऊशीर होतो?
प्रत्येकच फोन कॉल महत्वाचा कसा?
काय करते नक्की कंपनी तुझी? स्पेसमध्ये सेटेलाईट पाठवताय? क्वांटम फिजिक्समध्ये नवे शोध लावताय? नाही ना?
कोण आहेत मित्र तुझे?
तुझ्यावर पूर्णतः अवलंबून असलेले मनोशारीरिक विकलांग? तसंही नाही ना?
असं नक्की काय आहे, जे मला कध्धीच कळत नाही?
तू आज इथे नसण्यावर मी प्रश्नचिन्ह उभं करतच नाहीये. प्रश्न हा, की वेळेचं प्रॉमिस तुझंच असतं; वेळेत “येईनच” म्हणताना तुझाच आत्मविश्वास ओसंडत असतो; नंतर त्याच आत्मविश्वासाचा लगदा होतो; आणि यावरून काही विचारलं, तर मी ऐकायचं काय तर “तुला कळत नाही”…? असं कसं? आणि हे रोजचंच?
मजा सांगू? मजा खरी ही आहे, की मला सगळं अगदी व्यवस्थित कळतंय. मला कळतंय, की आपण जे “भारीतले” आहोत असा तुझा समज आहे ती व्यक्ती तू नाहीसच. मला कळतंय, की तुझ्या व्यक्तिमत्वाला ढीगाने लिमिट्स आहेत, जी जिंकली जाण्याऐवजी फक्त आणि फक्त कुरवाळली गेलीयेत; गोंजारली गेलीयेत; लाडावली गेलीयेत. प्रोफेशनल अन् पर्सनल, दोन्ही पातळ्यांवर. मला कळतंय, की तुझ्यात, managerial skillsची, व्यवस्थापनशास्त्राच्या समजेची मोठी वानवा आहे; पुस्तकी अभ्यासापल्याडचं व्यवहारज्ञान तोकडं पडतंय तुझं. कंपनी आणि इतर दुनिया आपल्याचमुळे जिवंत आहे या सोयीच्या गैरसमजात आयुष्य आटतंय तुझं. कंपनीत कॉम्पिटिशनचे बागुलबूवे उभे करून; “team is greater than one person” हे वाक्य ऐकवून, स्वत:च्या पर्सनल गरजांचा विचार केल्याबद्दल अपराधीभावाचा सापळा लावून; अन् महत्वाकांक्षांची गाजरं दाखवून गंडवलं जातंय तुझ्यासारख्यांना. तिथे मुत्सद्दीपणा कमी पडतोय तुझा. तुझ्यात communication skills, संभाषणकौशल्य नाहीत. तुला तुझे मुद्दे मांडताच येत नाहीत. बोलताना प्रचंड anxiety येते; त्यामुळे आपला कामसूपणा हा शक्ती म्हणून वापरता येत नाहीये तुला; त्याऐवजी तो तुझ्याच विरोधात तुला बिनपगारी ढोरमेहनतीत अडकवण्यासाठी वापरला जातोय.
कंपनीतून बाहेर पडल्यावर परत कोणतरी भेटतं – “चल, एक चहा मारू; तुला काही सांगायचंय…” तुला “नाही” म्हणताच येत नाही. दहा रुपयाच्या चहाच्या बदल्यात तुझा बहुमूल्य वेळ (जो तूच मला प्रॉमिस केलेला असतो) खिशात घालतात ही लोकं, त्यांच्या पर्सनल अडचणी तू सोडवाव्यात म्हणून. त्यासाठी तुझ्या कोणत्या भावनिक चाव्या कशा फिरवायच्या, हे जोखलेलं असतं त्यांनी. त्यासाठी तू जीवाचं रान करणार – माहीत असतं त्यांना. आणि नंतर तुला कसं सोयिस्कर विसरायचं, ते ही. तुझे रेझ्यूमे फॉरवर्ड करायचे झाल्यास मात्र यांना बरोब्बर तीन महिने लागतात – तोपर्यंत व्हेकन्सी गेलेली असते. “अरे यार… माझ्या बॉसने लफडा केला; नाहीतर ती पोस्ट तुझीच होती बघ…” कितीवेळा ऐकलंयस तू हे? नातेवाईक आणि मित्रांच्या मदतीला तू धावून जातानाही हे लगेच कळतं मला; कारण नंतर ‘सगळे माझा फायदा घेतात’ हे तुझ्याच तोंडून कितीदा ऐकलंय मी. तुला वाटत राहतं की सारंकाही तुझ्या कंट्रोलमध्ये आहे; आणि मग आयुष्य अचानक आजारपण तुझ्या वाटेवर सोडून सांगतं तुला, “गैरसमज आहे तुझा”.
रोज वेगवेगळे एक्सक्यूजेस माझ्या तोंडावर सहज फेकून मारले जातात; एकटेपण माझ्यावर रोज चाल करून येतं; अन् त्याच वेळी तुझ्या मित्रमैत्रिणींचे वाढदिवस, पार्ट्या, सिनेमे, पिकनिक, हे मात्र कधीच मिस होत नाही तुझ्याकडून. तिथे तुझी entry वेळेआधीच? “मला किनई, time management जमतंच नाही,” हे तू स्वत:बद्दल कौतुकाने सांगताना, मनात जाळ उठतो माझ्या; कारण ही mismanagement किती सोयिस्कर आहे, माहितीये मला. या यादीतल्या गोष्टी आपण दोघंही करू शकतो. माझ्याबरोबर इच्छा होत नाही? माझ्यात काही कमतरता आहेत? हरकत नाही; असतील तर त्यावर काम करायची तयारी आहे माझी. पण त्या कोणत्या हे मी दोन-तीनवेळा विचारलंही होतं. त्यावर “उगाच इश्यू नको करूस” या शब्दांनी माझे अनुत्तर प्रश्न जाळून टाकले…
या कमतरांबद्दल तुला दोष नाही देत मी. मला कळतंय, तुला स्वत:वर काम करण्याची गरज आहे. मला प्राचीन काळीच कळून गेलंय ते. त्यासाठी तुला पूर्ण साथ द्यायची तयारी आहे माझी. That’s what a relationship is about.
मला कळत नाही ते हे, की –
नक्की कोणत्या वेळी तुला हा साक्षात्कार झाला, की आपल्या या रिलेशनशिपची स्पेस, या मानसिक वृद्धीऐवजी, तुझ्या या वैचारिक अजागळपणासाठी तुला आंदण म्हणून दिल्ये?
नक्की कोणत्या वेळी तुला हा दृष्टांत झाला, की स्वत:ला सोयीस्कर माफ करून घेण्याचे तुझे एक्सक्युजेस छानपैकी लादण्यासाठी, गृहीत धरण्यासाठी, माझी निर्मिती झाल्ये?
नक्की कोणत्या वेळी तू ही आकाशवाणी ऐकलीस, की रिलेशनशिप म्हणजे आपापल्या जेंडर-गृपच्या नावाखाली खपवता येणारी फाजील कौतुकं करून घेण्यासाठी पार्टनरला वेठीस धरण्याची सोय असते?
नक्की कोणत्या वेळी तुला ही ज्ञानप्राप्ती झाली, की “समजून घेणं” आणि “स्वीकारणं” म्हणजे आपल्या पार्टनरचा आळशीपणा, पळपुटेपणा, लहानपणापासूनच्या स्वत:चाच पराभव करणाऱ्या कळकट सवयी आपल्या ऊरावर पांघरून घेणं असतं?
तुझ्या माहितीसाठी एक सांगायचंय.
रिलेशनशिपसाठी थोडा tolerance लागतो – ओह, पूर्ण मान्य आहे मला. पण जर अंथरूणातल्या लालसेपलीकडे आपली भेटच होत नसेल ना, तर रिलेशनशिप अस्तित्वातच नसते; फक्त एक “सोय” उरते. अन् मी कुणाचीतरी “सोय” म्हणून जगणार नाही; मला कुणाचीतरी “साथ” म्हणून जगायचंय.
माझ्या डिक्शनरीमध्ये, “acceptance” या शब्दाचा अर्थ होतो तो हा, की “इथे काही-एक उणीव आहे, कमतरता आहे, weakness आहे, तो स्वीकारणं; आणि त्यावर मात करण्यासाठी दोघांनी मिळून जाणीवपूर्वक प्रयत्न करणं”. त्यामुळे, त्या प्रयत्नांना माझी साथ प्रत्येक लढतीत, प्रत्येक युद्धात राहील. पण मुळात तुझी तयारी हवी, लढण्याची. हो, माझ्या प्रीतीच्या पाखरा, तुझी नसती कौतुकं आहेत तशीच राहतील अन् love, care, acceptance च्या नावाखाली मी स्वत:ला त्या फाजीलपणाखाली झिजवत राहीन, अशा भ्रमात चुकूनही राहू नकोस.
कारण जे काही कळून घ्यायचंय ते मी कधीचंच कळून घेतलंय; अन् त्यानंतर येणारं सोशिक मुर्दाडपण कधीचंच फेकून दिलंय. मला self-respect आहे; मी victim वगैरे होणार नाही. तू मला victimize करत आहेस असं मी मुळीच म्हणणार नाही; कारण तुझ्या या अजागळपणाला सहन करत जगणं हा एक choice आहे; तो निवडल्यास मीच स्वत:ला victimize करेन; जे मी कधीच करणार नाही.
सो – आता मला तुझा choice ऐकायचाय.
© अपूर्व विकास
समुपदेशक आणि मानसशास्त्रतज्ज्ञ
#रिलेशनशिप #प्रेम #बॉयफ्रेंड #गर्लफ्रेंड #डेटिंग #लग्न #वैवाहिक #जोडपं #सहजीवन #संवाद #विवाहपूर्व #विवाहोत्तर #समुपदेशन #भावना #साथ #मानसिक #गृहीत #कमतरता #स्व #मानसशास्त्र #tolerance #maturity #relationship #dating #LoveIssues #breakup #counseling #feelings #emotions #ApoorvVikas