© अपूर्व विकास
हा मेल तुम्हा दोघांनाही पाठवलाय. खरंतर पत्र पाठवायचा विचार होता. पण पत्र दोघात एक वाचायला तुम्ही दोघं हल्ली तितके एकमेकांजवळ आहात कुठे…?
उपदेश नाहीये हा. याला काय समजायचं ते मी तुमच्यावर सोडेन. आणि यातून काय घ्यायचं, तेही.
तुमच्या नात्याच्या सुरुवातीपासूनच्या कितीतरी गोड क्षणांसाठी साक्षिदार आहे मी ! एकजण CCDतून बाहेर पडताना आणि दुसरं आत येताना, डोळे अंतरात भिडले होते ना तुमचे, त्याच क्षणापासून. त्या निसटत्या वेळी जाणवू न देता क्षणांनी ओढ दिली होती, तेव्हापासून. चार गालांचे प्रतिकार झुगारून दोन ओठांवर स्मित साकारलं, आणि इकडे माझ्याच मनात एक ज्योत उजळली… तेव्हाच पासून…!
तुमच्या किती भेटी मीच घडवल्या रे ? बागेतल्या हिरवळीवर तिघांच्या गप्पांचे फड भरताना, शब्दांच्या गर्दीत दोन वेगळ्याच अबोल कळ्या उमललेल्या पाहून, हळूचकन तिथून काढता पाय घेण्याचं शहाणपण मी कितीदा जमवलं रे ? मी कधी कल्टी मारली हे तुम्हाला कळलंही नाही, याचा राग न मानता, तुम्ही एकमेकांवर केलेले जोक्स नंतर मलाच फॉरवर्ड झालेले पाहून, हसण्याच्या कारंज्यात किती संध्याकाळी तरूण झाल्या रे ? दोघांच्या काळ्याभोर नजरेत काही विभोर सांगायचं होतं; ते मीच ओळखायचं… मीच ह्याचं तिला अन् तिचं ह्याला सांगायचं… गुंफलेल्या बोटात लपलेल्या भावनांना पाहून मीच त्यांना शब्दात रचायचं… च्यायला, अगदी प्रपोज कसा करायचा तेही मीच acting करून समजवायचं, जीन्स गुडघ्यावर फाटेस्तोवर…!
जे होतं ते गोड चुटूक होतं ! लग्नात काय तेजस्वी दिसत होतात रे…! दोघं एक झालात तेव्हा एकमेकांत भरून पावलात. विश्वास होता. परस्परांमधल्या फरकांप्रति सहनशीलतेचा घरोबा होता. आणि…
त्या सहनशीलतेच्या वाढत्या राबत्यात, पाठोपाठ, एकाने दुसऱ्याला गृहीत धरण्याने हातपाय पसरले…
I think… घात तिथेच झाला होता…
मला पहिल्यांदा कधी कळलं माहितीये ? तुमच्यातल्या एकाच्या कॉलेजच्या गृपचं गेट-टुगेदर होतं; आणि अचानक सिंहगडला जायचा प्लान ठरला. हे जे एक होतं, ते पटकन हो म्हणालं. मी विचारलंही, “घरी वाट बघत असेल ना?” त्यावर उत्तर म्हणून एक भुवई बेफिकीर उडली. “वाट पाहील नि झोपून जाईल, त्यात काय एवढं?” डोळ्यातल्या उथळपणात मी पूर्वीची काळजी शोधली; नाही सापडली. तिथेच कळलं मला.
दोघातल्या या एकाने नखं वाढवलीयेत; जाणवत होतं. पूर्वीची एक मृदू जीभ आता डंख मारू लागली होती; अन् तिच्या better half सोशिकाने सहनशीलतेला साजेशी चण आक्रसवणंही सुरू केलं होतं. बेफिकीर बेणं एक दिवस रात्री आठला यायचं कबूल करून पहाटे दोनला आलं, तेव्हा सोशिकाचा फोन मलाच आला होता, अकरा वाजता. चिंतेने भरलेला. आठवतंय त्या दिवशीचं? आम्ही दोघंही वाट पाहत होतो, जागे राहून. दार उघडल्यावर प्रथम नशेच्या भपकाऱ्यासहित एक प्रश्न संशयाच्या सुईने मला टोचला गेला, “तुझं काय काम आहे इथे, आत्ता या वेळी?” त्यावेळी, हे दिव्यात्म्या, मला बसलेल्या धक्क्यापेक्षा, मी तुझ्या better half कडे पाहिलं ना, तेव्हा सोशिकतेचा तो चेहरा आघाताने चिंधड्या झालेला पाहिल्याचा शॉक मोठा होता मला.
ज्यांच्या वचनांची ग्वाही मीच दिली होती, त्यातल्याच एकाच्या वचनांचे भावार्थ गमावले जाताना पाहायचं दुर्दैवही माझंच. कामं नि पार्ट्या निष्काळजी लांबलेल्या – काही लिमिटच नाही. “तू जरा समजून घे ना…” समजेच्या या एकेरी अपेक्षा शेवटी आंबतात नि बुरसटतातच रे… “आपलं नातं नक्की कुठे चाललंय?” या आर्त प्रश्नावर आपण जेव्हा “मला आत्ता फालतू बोलण्यासाठी वेळ नाहीये,” ही प्रतिक्रिया देतो ना, तेव्हा ‘समजून घेण्या’तलं अपंगत्व आपलं असतं. आणि नक्की काय समजून घ्यायचंय ? आपली बेजबाबदार बालिशपणाची हौस ? का, रिलेशनशिप त्यासाठीच असते, हा आपला गैरसमज स्वीकारला जायला हवाय ? घरी येण्याची वेळ उलटून गेल्यावर जेवणाच्या ताटांनी आस्वाद गमावले रे. तसेच gift बरोबरच्या हिशेबी क्षमायाचनांनी क्षमेचे हेतूच हिरावले. कोंडमाऱ्यानंतरच्या तुटक हुंकारांनी निराश अश्रू लपवले असतील; पण ते रात्री दीडला त्याच सोशिकाच्या माझ्याशी होणाऱ्या texting मध्ये दिसलेच मला.
मागल्या आठवड्यात तुमच्या घरी माझं येणं झालं, तेव्हा बेल वाजवण्याआधी आतलं भांडण ठणठणून माझ्या कानावर आलंच. “मला बोलायचंय तुझ्याशी,” हे ऐकलं. त्यावर क्षणाचाही वेळ न दवडता “नसेल पटत तर दार उघडंय, मला घेणं नाही कशाशी,” हेही ऐकलं. नातं उपाशी होतंच; पण आता बेफिकीर प्रत्युत्तरात संवादाचा खून पडल्यावर उपाशी नात्याची भूकही मेली होती. तो तुमचा अंतिम पराभव होता.
…शेवटी नको ते परवा घडलंच.
सोशिक माझ्या दारी. रात्रीचं. नुकतंच काहीतरी घडलंय हे स्पष्टच दिसत होतं. काहीएक न बोलता ते शरीर आवेगाने माझ्यावर झेपावलं, तेव्हा मनाच्या भूकेसाठी शरीराचा हिशेब मांडला जाताना पाहून माझंच मन फाटलं. एकाचवेळी दूर ढकलण्याची आणि बाळाला घ्यावं तसं जवळ घेण्याची ऊर्मी मनात. खरंतर शरीर मलाही आहे. समोरच्या संधीचा मस्तपैकी फायदा घेता आला असता मला; पण आपणच बांधलेला देव्हारा आपणच विटाळायचा ? शेवटी ते शरीर कोसळलंच. दोन तास रडून झाल्यावर माझ्याच हॉलमध्ये झोपूनही गेलं – मला सताड जागं ठेवून. सकाळी अस्फूट “सॉरी” म्हणून… गेलंही. आणि काल बेफिकीर बेणं आलंच. आता चेहऱ्यावर बेफिकीरीचा लवलेशही नव्हता. दिवाभीताला बाराच्या ऊन्हात उभं केल्याप्रमाणे बावचळलेला चेहरा – त्या एक्सप्रेशन्सनी “मला घेणं नाही कशाशी” या वाक्यातली गुर्मी फसवली होती ! थरथरत्या हातात चहाचा कप देताना मलाच वाईट वाटलं. “काही नाही झालं आमच्यात” हे सांगितल्यावर क्षणभर पोरसवदा आनंद… आणि मग एक पोक्त नि:शब्द उद्ध्वस्तपणा…
त्या उद्ध्वस्ततेला मला विचारायचंय, प्रपोजच्या वेळचे डायलॉग्ज आठवतायत ? “I’m there for you,” बोललेलं आठवतंय? कदाचित डायलॉग्ज माझेच असल्यामुळे मला त्यातलं प्रेम जास्त आठवतंय; तू फक्त तोंड वाजवलंस. राग येतोय आता, पार्टनरचा? आणि माझा? मला निवडलं गेलं म्हणून? बरोबर आहे तुझं. मला पर्याय म्हणून निवडलं जाण्याची गरजच यायला नको होती – ती आली. कारण? कारण हेच, की मंगलाष्टकं ऐकेपर्यंतचं प्रौढत्व “तदेव लग्नम्” हा assurance मिळाल्यावर पुन्हा पोरकट झालं ! खेळणं ‘आपलं’ झालं ना…! आता आपल्याला वाटेल तेव्हा खेळू; खेळून झालं की शो-केस मध्ये ठेवून देऊ ! तिथे खेळणं निपचित वाट पाहत राहील आपली, आपण परत लक्ष देईपर्यंत…
नाही जमत तसं. कारण ते खेळणं नसतं. ते माणूस असतं. त्याला भावना असतात. इच्छा असतात. गरजा असतात. आणि ते आपलं माणूस असल्यामुळे त्या गरजा आपण आपल्या करून घ्यायच्या असतात. Rather, तसं प्रेम देण्याच्या इच्छेसाठीच रिलेशनशिप असते; अन्यथा नुसतं घेणंच असेल तर “Cherry is waiting for you, only 1.5km away” या SMSमधूनही काम होऊन जातं; उगाच लग्न कशाला पाहिजे? ही जबाबदारी नाही झेपली, तर आपल्यात गुंतलेली नजर विचलीत होणारच. कालचं हादरणं नीट आठव. पार्टनर “दुसरीकडे” जाऊ शकतं, ही शक्यता प्रत्यक्षात आल्यावर कशी मस्त ‘फाटते’ ना? आपण समजतो तेवढे आपण निगरगट्ट नसतो. गरजा आपल्याही असतात. त्या पूर्ण व्हायच्या असतील, तर पार्टनरला गृहीत धरण्याचे नखरे बंद करायचे असतात. “वेळ नाही” म्हणजे काय च्यायला? अन्न-वस्त्र-निवाऱ्यानंतर प्रेम हीच गरज उरते; तिच्यासाठी वेळ नाही? चूलीत घाल त्या पार्ट्या.
काल माझ्याकडून निघताना मी ऐकलं, “मला माझं प्रेम परत हवंय”. मिळेल. पण स्वत:ला ओतावं लागेल. तुमचं नातं भोक पडलेलं पीठाचं पोतं आहे. वारं मोकाट सुटतंच; पोतं रिकामं होत जातं. आधी हळूहळू. मग पटापट. प्रीतीचं जमून परत विरणं एक पोकळी मागे ठेवून जातं; त्या पोकळीत रिकामं पोतंही परवाप्रमाणे भरकटणारच ना? आता सावरायला हवं. पेरणी पहिल्यापासून पुन्हा हवी. नव्याने. बाहेरची हिशेबी गणितं कितीही मांडली, तरी भावनेची कोवळिक परत हवी असेल तर जवळिकीचं लेणं साकारायलाच हवं. अंतरात भेटलेल्या त्या नजरांपासून, पुन्हा. म्हणूनच, माझ्याकडून, हे एक :- मी आज संध्याकाळी परत त्याच CCDत असणार आहे. वाट पाहीन. या आशेमध्ये, की माझे दोन जिवलगही तिथे असतील. माझ्या ओळखीच्या दोन नजरा एकमेकींना परत नव्याने भेटतील… आणि क्षण ओढ देण्याची हिंमत दाखवतील…
© अपूर्व विकास
समुपदेशक व मानसशास्त्र तज्ज्ञ
(निगडी, पुणे)
8928183848(Phone)
7774917184(Phone/WhatsApp)
(लेख शेअर केल्यास आभार. कृपया शेअरिंग लेखकाच्या तपशीलासहित करावं, ही विनंती.)
#प्रेम #विवाह #लग्न #प्रेमविवाह #विवाहबाह्य_संबंध #दुरावा #भावना #भावनिक #विचार #वैचारिक #सहन #सहनशील #सोशिक #गुंतणं #मन #मानसिक #संवाद #शब्द #विसंवाद #गृहीत #समुपदेशन #समुपदेशक #गरज #पार्टनर #नवरा #बायको #पती #पत्नी #माणूस #सामंजस्य